जिल्‍ह्यातील तीन मंत्री समन्‍यायी पाणी वाटप कायद्यात बदल करुन घेण्‍याबाबत पुढाकार का घेत नाहीत?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- राज्‍याचे जलसंपदा मंत्रीच पाण्‍याच्‍या बाबतीत विविध वक्तव्‍य करुन, लाभक्षेत्रातील शेतक-यांमध्‍ये संदीग्‍धता निर्माण करीत आहेत.

मात्र सरकारमध्‍ये बसलेले जिल्‍ह्यातील तीन मंत्री समन्‍यायी पाणी वाटप कायद्यात बदल करुन घेण्‍याबाबत पुढाकार का घेत नाहीत? असा सवाल भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. समन्‍यायी पाणी वाटप कायद्यामुळे जिल्‍ह्यावर होत असलेल्‍या अन्‍याया विरोधात कायद्याची लढाई पुन्‍हा सुरु करणार असून, पाण्‍याच्‍या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नसल्‍याचा स्‍पष्‍ट इशाराही त्‍यांनी दिला.

गोदावरी लाभक्षेत्रातील शेतक-यांच्‍या पाणी प्रश्‍नाच्‍या संदर्भात आयोजित केलेल्‍या बैठकीत आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडून पाण्‍याबाबत करण्‍यात आलेल्‍या वक्‍तव्‍याचा चांगलाच समाचार घेतला. यापूर्वी समन्‍यायी पाणी वाटप कायद्यामुळे जिल्‍ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतू जिल्‍ह्यातील कुठलाही नेता यावर बोलायला तयार नाही. समन्‍यायी पाणी वाटप कायदा मंजुर होत असतानाही अनेकजणं गप्‍प बसुन राहीले.

सत्‍ता गेल्‍यानंतर एक थेंबही पाणी जावू देणार नाही अशा वल्‍गना करीत होते. आता सत्‍तेत गेल्‍यानंतर या विषया संदर्भात त्‍यांनी पुन्‍हा गप्‍प बसण्‍याची भूमिका घेतली असल्‍याकडे लक्ष वेधून, राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारमध्‍ये जिल्‍ह्यातील तीन मंत्री आहेत. त्‍यांनी समन्‍यायी पाणी वाटप कायद्यामध्‍ये बदल करुन घेण्‍याबाबतचे दायित्‍व पुर्ण करायला हवे होते.

परंतू स्‍वत:ला मोठे समजणारे नेते मात्र जिल्‍ह्यावर होत असलेल्‍या अन्‍यायाबाबत काहीच करताना दिसत नाहीत अशी टिकाही आ.विखे पाटील यांनी केले. या कायद्याच्‍या विरोधात शेवटपर्यंत न्‍यायालयील लढाई आपण लढलो. सर्वोच्‍च न्‍यायालयाने याबाबत काही सुचना खालच्‍या न्‍यायालयाला दिल्‍या होत्‍या.

याबाबत आता पाठपुरावा करुन पुन्‍हा ही लढाई सुरु करणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. सत्‍ता असो अथवा नसो हक्‍काच्‍या पाण्‍याची लढाई करण्‍याची शिकवण आदरणीय खासदार साहेबांनी आम्‍हाला दिली. पाणी प्रश्‍नावर त्‍यांनी कधी तडजोड केली नाही. भाजप सरकारच्‍या काळातही पाणी प्रश्‍नाबाबत चुकीच्‍या निर्णयांना आपण विरोधच केला.

कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात वळविण्‍या बाबतचा पाणी परिषदेचा प्रस्‍ताव भाजप सरकारने स्विकारुन त्‍याची अंमलबजावणीही सुरु केली होती. याबाबत तयार केलेल्‍या योजनेची अंमलबजावणी तातडीने होणे हाच यावर उपाय आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारची याबाबतीत उदासिनताच दिसत असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe