अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, तसेच मैलामिश्रीत पाण्याचा पुरवठा यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी महानगरपालिकेवर हंडा मोर्चाचे आयोजन केले.
दरम्यान याबाबत वारंवार तक्रार करुनही समस्या सुटत नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महापालिकेच्या प्रभाग क्र.10 मधील भारस्कर कॉलनी,
लालटाकी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अनियमीत पाणीपुरवठा केला जात आहे. या परिसरा जवळच जिल्हा परिषद वसाहतीमध्ये महापालिकेची पाण्याची उंच टाकी आहे.
तरीही या भागाला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनियमीत पाणीपुरवठ्या बरोबरच नळावाटे दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा होत आहे.
याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांना अनेकदा सांगूनही त्यांच्याकडून कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व महिलांच्यावतीने महापालिकेवर आज हंडा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आयुक्तांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच या भागातील मुजोर पाणीपुरवठा कर्मचार्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम