अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील करण्यात येत आहे.
यातच नुकतेच सोनई येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी मंगळवारी सकाळी अचानक भेट दिली. यावेळी सोनई गावाला भेट देवून बसस्थानक परीसरात शासन नियमांचे उल्लंघन दिसताच तीन दुकाने एक महिन्यासाठी सील करण्याचा आदेश दिला आहे.
प्रशासनाच्या बेधडक कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि , सकाळी घोडेगाव येथून राहुरीला जात असताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले सोनईतील आंबेडकर चौकात मोटारीतून उतरले व पायी चालत त्यांनी पाहणी सुरु केली.
अर्बन बँकेसमोरील इलेक्ट्रॉनिक दुकानात जावून त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुकान सील करण्याचा आदेश दिला. दरम्यान खुद्द जिल्हाधिकारी स्वतःच राउंडला उतरलेले दिसल्याने त्यानंतर गावात एकच धावपळ उडाली.
सोनई बसस्थानक परीसरात असेलेल्या विकास सोन्याबापू बोरुडे यांचे स्प्रे पंप शॉप, विनायक मोरे यांची मोबाईल शॉपी व निखील दहातोंडे यांचे इलेक्ट्रॉनिक दुकान ही तीन दुकाने पोलीस व महसूल विभागाने एक महिन्यासाठी सील केली.
यावेळी सोनईचे पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे पथक उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुरीला रवाना झाल्यानंतरही दिवसभर सर्व दुकानदार नियमांचे पालन करताना दिसले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम