अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
यातच नगर तालुक्यातील एका ठिकाणी वीज कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे जनावरे चारणार्या दोन शेतकर्यांवर वीज कोसळली.
या दुर्घटनेमध्ये भानुदास बाबूराव शेटे (वय 62) यांचा मृत्यू झाला. तर गणपत सखाराम पिसे (वय 75) हे जखमी असून त्यांच्यावर भाळवणी (ता. पारनेर) येथील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भानुदास शेटे आणि गणपत पिसे (दोघे रा. टाकळी खातगाव) हे शेळ्या चारण्याचे काम करतात. दोघेही नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले. अचानक वार्यासह पावसाला सुरूवात झाली.
दरम्यान या भागात वीज कोसळून मोठा आवाज झाला. त्यामुळे या भागातील शेतकरी वीज कोठे कोसळली, हे पाहण्यासाठी गेले. त्यावेळेस भानुदास शेटे हे वीज कोसळून मृत्यूमुखी पडले होते.
गणपत पिसे हे जखमी झाले होते. पिसे यांना उपचारासाठी भाळवणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाऊ लागली होती. शेटे यांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम