अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे व दीड महिन्यापासून दररोज सतत होणाऱ्या पावसामुळे हजारो एकरावरील शंभर टक्के शेतीपिके वाया गेली आहेत.
यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी अन्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह भाजपाचे सर्व आजी, माजी आमदार, खासदार व पदाधिकारी कोणतीही सूचना न देता आमरण उपोषण करतील, असा इशारा आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत आ. राजळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेड्डीवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान या निवेदनात त्यांनी म्हटले की, शेतात पुराचे पाणी शिरून शेती खरडून गेली, वाड्या-वस्त्यांवरील घरात व शहरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडेलत्ते यांचे नुकसान झाले.
शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले त्याला दीड महिना उलटून गेला मात्र सरकारने अजून एक रुपयाची मदत नुकसानग्रस्तांना दिली नाही.
शासनाने संवेदना दाखवून अतिवृष्टी झालेल्या भागात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे सरसकट मदत नुकसानग्रस्तांना द्यावी.
तसेच घरांचे, जनावरांचे व संसारोपयोगी साहित्याचे व व्यावसायिकांच्या दुकानांचे नुकसानभरपाईसाठी आर्थिक मदत करावी, अन्यथा लोकभावनांचा उद्रेक होऊन शासनाच्या विरोधात नुकसानग्रस्तांसह लोकप्रतिनिधींना उपोषण व आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल आसाही इशारा आ. राजळे यांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम