अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- कोरोना आणि त्यानंतर आस्मानी संकट यामुळे बळीराजा चांगलाच भरडला गेला होता. हाती येणाऱ्या उत्पादनावर पावसाने पाणी फेरले व या सर्वातून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. चक्रीवादळ व गाराच्या पावसामुळे पुणतांबा परिसरातील कांद्याच्या चाळीतील अंदाजे 100 टन कांदा सडल्याचे प्राथमिक पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रेल्वे स्टेशन समोर शेतकरी कंपनीच्या गोडावूनमध्ये साठविलेल्या 1136 टन कांद्यापैकी 90 टन कांदा पूर्णपणे सडला असून कंपनीला तो फेकून देण्याची वेळ आली आहे.
कंपनीने कांदा साठविण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या 36 चाळी गोडाऊनमध्ये तयार केलेल्या असून त्यात नाफेड मार्फत शेतकर्यांकडून 16 रुपयांपासून 23 रुपये दरापर्यंत खरेदी केलेला कांदा साठविण्यात आलेला आहे.
चक्रीवादळ व गाराच्या पावसामुळे शेडचे नुकसान होऊन त्यामुळे कांदा सडल्याची माहिती या कंपनीच्या अध्यक्षा सुनीता धनवटे यांनी दिली.
अंदाजे 40 मजुरांमार्फत कांद्याच्या चाळीतील खराब कांदा बाजूला करण्याचे तसेच चांगला कांदा गोणीत भरण्याचे काम सुरू केले आहे.
कांदा साठविताना योग्य काळजी घेऊनही अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे कांदा सडल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील बोरबने वस्ती,
चव्हाण वस्ती, डेरा नाला भागात शेतकर्यांच्या चाळीतील कांदा सडला आहे. सध्या कांद्याला भाव असला तरी कांदा सडल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम