महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील ‘या’ बँकेत ५६ लाखांचा अपहार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- बनावट कागदपत्र तयार करून कर्ज प्रकरणे मंजूर करून बँकेच्या पैशाचा स्वतःच्या फायद्या करिता अपहार करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर शहरातील तत्कालीन युनियन बँकेच्या व्यवस्थापकासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन कुमार, रूपेश धारवाड (दोघांचा पत्ता माहीत नाही) व विलास एल. कुटे (गणपती मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत समाधान सीताराम पवार (वय ३५, रा. रामनगर, सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,

की सन २०११ ते २०१३ दरम्यान युनियन बँक ऑफ इंडियाचे (पूर्वाश्रमीची कार्पोरेशन बँक) तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, सिंगल विडो ऑपरेटर रूपेश धारवाड व मध्यस्थ विलास कुटे यांनी संगनमताने १५ जणांच्या नावावर शेतीसाठी कर्जप्रकरणे मंजूर केली होती.

या कर्ज खात्याच्या अनियमिततेमुळे चौकशीसाठी आलेल्या पुणे येथील विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उडवाउडवीच्या उत्तरामुळे संशय बळावल्याने, शाखा व्यवस्थापक समाधान पवार यांना सविस्तर चौकशी करण्यास सांगितले.

यामध्ये बँकेच्या तत्कालीन शाखाधिकारी नितीन कुमार यांनी दि. १/१/२०११ ते दि. ३१/२२/२०१३ बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरणे मंजूर करून ५६ लाखांचा अपहार केला. या कामासाठी त्यांना रुपेश आर. धारवड, विलास एल कुटे (रा. गणपती मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर) दोघांनी सहकार्य केले.

हा अपहार उघडकीस आल्यानंतर शाखा व्यवस्थापक समाधान पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, रुपेश आर. धारवड, विलास एल. कुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe