अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कसारे गावच्या दलित सरपंचांना चपलेचा हार घालून ‘आम्ही महार सरपंचाचा असाच सत्कार करतो’ असे म्हणत पाणउतारा केला गेला आहे.
याप्रकरणी कसारे गावाचे सरपंच महेश अण्णासाहेब बोराडे रा. कसारे यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, काही दिवसांपूर्वी कसारे गावात ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या, यात आरक्षण सोडतमध्ये सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवले गेले.
यात महेश अण्णासाहेब बोराडे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. परंतु सरपंचपदाची आस लावून बसलेल्या काहींना हे जमले नाही. कुणी दलित आपले प्रतिनिधित्व का करेल? या भावनेतून नवनिर्वाचित सरपंच काही कामासाठी तालुक्याला जात असताना रस्त्यात त्यांची गाडी थांबवून त्यांना शिवीगाळ केली गेली आणि चपलेचा हार टाकला गेला.
याप्रकरणी “आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला गेलो तर तिथं आम्हाला ५ तास बसवून ठेवण्यात आलं. दुपारी गेलेलो असताना अखेर सायंकाळी ७ वाजता आमची तक्रार नोंदवून घेतली. यावेळी माझ्यावर आरोपींच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला,” असा आरोप बोराडे यांनी केला.
आम्ही यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी देखील या आरोपींना पाठिशी घातलं आहे,” असा आरोप केलाय. दरम्यान, या घटनेचा विविध संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. याआधी गावात अनुसुचित जातीचा सरपंच नव्हता.
यावेळी आरक्षण असल्यानं मी सरपंच झालो, मात्र हे या जातीवादी लोकांना सहन झालं नाही. त्यामुळेच आम्हाला त्रास दिला जातोय, असा आरोप बोराडे यांनी केलाय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम