‘या’ तालुक्यातील नागरिकांना दाखल्यासाठी तलाठ्याकडे चकरा मारण्याची गरज भासणार नाही; वाचा सविस्तर…..

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- सरकारी काम म्हटले की अनेकदा सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणे हे जणू समिकरणच झाले आहे. त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्यांना तर तलाठ्याकडे अनेक चकारा माराव्या लागतात.

मात्र आता कर्जत-जामखेडच्या नागरिकांची या कटकटीतून सुटका होणार आहे. त्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सर्व मंडळ स्तरावर ‘महाफेरफार अदालती’चे आयोजन करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

आमदार रोहित पवार हे मतदारसंघात वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून नुकतेच त्यांनी ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकूण घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. स्वत: आमदार सर्व अधिकाऱ्यांना घेऊन गावात आल्यामुळे नागरिकांच्याही अनेक अडचणी दूर होण्यास मदत झाली.

आता त्यांच्याच प्रयत्नांतून मतदारसंघात ‘महाफेरफार अदालत’ घेण्यास सुरवात झाली आहे. वेगवेगळ्या नोंदी लावण्यासाठी अनेकदा नागरिकांना तलाठ्याकडे चकरा माराव्या लागतात. चकरांच्या या फेऱ्यातून सुटका करण्यासाठी मतदारसंघात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी ‘महाफेरफार अदालती’चे आयोजन करण्यात आले आहे.

मतदारसंघातील सर्व मंडळ स्तरावर ही ‘महाफेरफार अदालत’होणार आहे. या ठिकाणी नागरिकांना बोलावून एक महिन्यापेक्षा जास्त दिवस नोंदीसाठी त्यांचा अर्ज प्रलंबित असेल तर त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. यामुळे तलाठ्यांकडून नोंदी लावण्याचे काम होण्यास मदत होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe