एसटी कामगारांना भडकावून आंदोलन पेटविण्याचे काम सुरुये…अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- एअर इंडियाच्या खाजगिकरणावर चुप्पी साधणारे राज्यात एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा भडकावून वातावरण बिघडवत आहेत असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भाजपवर केला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘ एसटी कामगारांचे आंदोलन भाजपच्या वतीने जाणीवपूर्वक चिघळवले जात आहे. एसटीचे सर्व कर्मचारी आमचेच आहेत. त्यांच्या मागण्या आम्हालाही पटतात.

सरकार याबाबत सकारात्मक आहे. असे असूनही विरोधी पक्षातील काही आमदार आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलकांना भडकवत आहेत. साठ वर्षांत कधीही एसटी विलीनीकरणाचा प्रश्न उपस्थित केला गेला नाही. मग आत्ताच कशामुळे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे, हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे.

विरोधकांच्या राजकारणामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये. केंद्र सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण केले. केंद्रातील सरकार भाजपचे आहे.

मग त्याच्या विरोधात राज्यातील भाजप नेते व सदर आमदार गप्प का आहेत? केंद्र सरकारने खासगीकरण केले तर चालते, मात्र आम्ही एसटीचे खासगीकरण करणार नसतानाही जाणीवपूर्वक एसटी कामगारांना भडकावून आंदोलन पेटविण्याचे काम ही मंडळी करीत आहेत,’ अशी टीका पवार यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe