‘जय भीम’ चित्रपटाच्या निर्मात्यांना ५ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

मात्र नुकतेच अभिनेता सूर्यासह ‘जय भीम’ चित्रपटाचे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडीओला ५ कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आलीय.

या प्रकरणी ‘वेन्नीयार संगम’ संघटनेचे राज्याध्यक्षांनी त्यांना नोटीस देत या चित्रपटातील काही दृष्य काढून टाकण्याची मागणी केली आहे. सिनेमा प्रचंड गाजत असताना हा नवा वाद समोर आल्याने याचा सिनेमावर परिणाम होण्याची शक्याता आहे.

चित्रपटावर नेमका आक्षेप काय? ‘वेन्नीयार संगम’नुसार जय भीम चित्रपटात दाखवलेल्या काही दृष्यांमुळे वेन्नीयार समुदायाची बदनामी झाली आहे. प्रतिमाहनन करणारी ही दृष्यं चित्रपटात मुद्दाम टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.

तसेच वेन्नीयार समुदायाविषयीचे दृष्य चित्रपटातून काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आलीय. त्यांच्यानुसार चित्रपटात दाखवलेला ‘अग्नी कुंदम’ हे प्रतिक वेन्नीयार समुहाची ओळख आहे.

नोटीसमध्ये देण्यात आले आहे की, “चित्रपटात कोठडीत निर्दोष व्यक्तीचा छळ करून त्याची हत्या करणाऱ्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव ‘गुरुमुर्ती’ असं ठेवण्यात आले आहे.

तसेच त्याचा उल्लेख गुरू असा करण्यात आलाय. गुरू हे वेन्नीयार समुदायातील एका मोठ्या नेत्याचं नाव आहे. याशिवाय पीडिताच्या मृत्यूची तारीख सिद्ध करताना या आरोपी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात दाखवलेल्या कॅलेंडरवर वेन्नीयार समुदायाचं प्रतिक दाखवण्यात आल आहे,” या बदनामीसाठी निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी असे देखील सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe