अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- राहाता परिसरात शाही खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाईटनर रुमालवर टाकून त्याचा गंध घेऊन नशा करणारे तरुण परिसरात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत.
व्हाईटनरच्या या नशेमध्ये 14 ते 18 वर्षाच्या अनेक मुलांच्या आरोग्याची दुर्दशा होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. . राहाता तालुक्यात व्हाईटनरची नशा सध्या चर्चेचा व तितकाच गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक विद्यार्थी शाळेत न जाता हे व्यसन करतात. हल्ली जनरल स्टोअर्समध्ये व्हाईटनरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. काही वर्षांपूर्वी कोरॅक्स, आयोडेक्स औषध सेवन करून तरुण वर्ग व्यसनाधीन झाला होता. व्हाईटनर रुमालावर टाकून त्याचा गंध घेऊन व्यसनाचा फंडा परिसरात तरुणांच्या हाती लागला आहे.
या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. राहाता शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. राहाता शहरात परराज्यातून गुटखा मोठ्या प्रमाणात शहरात विक्रीसाठी आणला जातो व तो तालुक्यातील विविध ठिकाणी विक्रीसाठी दिला जातो.
शहरात अवैधरित्या गुटखा विक्रीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात असताना पोलीस प्रशासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. पोलिसांनी तात्पुरती कारवाई करून काही काळ या नशेबाज तरुणांवर अंकुश ठेवला होता. परंतु पुन्हा नशा करणार्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
यामुळे यावर कठोर कारवाई आवश्यक आहे. तसेच तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळा व महाविद्यालयात मुलांना प्रबोधन करणे गरजेचे आहे अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम