अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौक परिसरात टाकलेल्या छाप्यात बायोडिझेलचा साठा जप्त केला होता.
याप्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडील माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढली आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या बायोडिझेल तस्करीत शिवसेनेचा शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप सातपुते याचे नाव समोर आले असून तोच या तस्करीचा मास्टरमाइंड असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी सातपुते याचा आरोपी म्हणून समावेश केला असून त्याचा चौफेर शोध सुरू केला आहे. पोलीस तपासाची कुणकुण लागतात सातपुते नगर शहरातून पसार झाला. सातपुते याचे नाव समोर आल्याने या गुन्ह्यात सहभाग असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले असून त्यांनीही शहर सोडल्याची चर्चा आहे.
22 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस व पुरवठा विभागाने केडगाव बायपास चौकातील हॉटेल निलच्या मागील बाजूस असलेल्या पार्कींगमध्ये टाकलेल्या छाप्यात दोन टँकरमधून मालवाहू ट्रकच्या इंधनाच्या टाकीमध्ये बायोडिझेल भरले जात असल्याचे आढळून आले होते.
याप्रकरणी कोतवालीत गुन्हा दाखल आहे. सुरूवातीला दोन व नंतर सहा अशा आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आता आरोपींची संख्या 20 झाली असून बायोडिझेल प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. 12 आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
बायोडिझेल तस्करीत राजकीय नेत्याचा हात असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून नगरमध्ये चर्चा होती. पोलिस मात्र कासव गतीने या गुन्ह्याचा तपास करत होते.
बायोडिझेल तस्करीचे नगरचे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर अखेर कोतवाली पोलिसांना या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करावा लागला. या तस्करीत सातपुते याच्यासह आणखी कोणाचे नावे समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम