अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पीडित कुटुंबांच्या वारसदारास ‘युवान’मार्फत नुकतीच प्रत्येकी रु. ५००० मदत करण्यात आली. तसेच आवश्यक संवाद साधून मानसिक आधार देखील देण्यात आला.
माणुसकीच्या भावनेतून करण्यात आलेल्या या मदतीसाठी मुंबईचे प्रविण टन्ना यांनी सहयोग दिला. यावेळी युवानचे संस्थापक संदिप कुसळकर, सचिव सुरेश मैड, जलारामचे नकुल चंदे, हेमंत लोहगावकर, संजय दळवी, प्रसन्न पाठक आदी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडात १३ गरीब रुग्णांचा बळी गेला आहे. दुर्घटनेनंतर अनेक मंत्री जिल्ह्यात येऊन गेले. राजकीय आरोप-प्रत्यारोप चालू आहेत परंतु अशा वेळी ‘युवान’ मार्फत देण्यात आलेला प्रत्यक्ष आधार आमच्यासाठी मोलाचा असल्याचे तेलकुडगाव ता.नेवासा येथील पीडित घोडेचोर कुटूंबियांनी व्यक्त केले.
माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आम्हाला या निम्मिताने आला, असे पीडित भगवान पवार यांनी म्हटले. त्यांचा एक पाय दुर्घटनेत भाजला. अद्यापही त्याच्या वेदना कायम आहेत पण युवानच्या मदतीने यावर वेदनेवर फुंकर घालण्यात आली. अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले.
“ जिल्हा रुग्णालयात दुर्घटनेमुळे सर्व नगरकरांना मोठ्या वेदना झाल्या. ‘टिम युवान’ वंचितांच्या शिक्षण आणि रोजगारासोबत अडचणीच्या वेळी मदत कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. अनाथ, वंचित युवकांनीही अनेकदा आपल्या घासातला एक घास वेळप्रसंगी गरजूंना दिला आहे.
कोरोना आणि पूरग्रस्त भागात मदत कार्य करतांना याचा नुकताच प्रत्यय आला आहे. अशा मदत कार्याचाच एक भाग म्हणून आणि पिडीत कुटूंबांना मानसिक आधार देण्यासाठी ‘युवान’ मार्फत प्रत्यक्ष पुढाकार घेण्यात आला. संगमनेर येथील ३७ वर्षीय दीपक जडगुळे या तरुणाचा देखील अग्निकांडात बळी गेला.
त्यामुळे त्यांची दोन मुले अनाथ झाली. त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी देखील ‘युवानमार्फत’ स्विकारण्यात आली आहे. लोकसहभागातून हे कार्य सुरु असल्याने दानदात्यांनी त्यासाठी हातभार लावावा.” – संदिप कुसळकर, संस्थापक- युवान जखमींच्या उपचार खर्चाबाबत अद्यापही मोठी हेळसांड होत असल्याची
बाब ‘टिम युवानच्या’ या निम्मिताने निदर्शनास आली. त्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि प्रशासनाने पीडित कुटुंबांना अधिक त्रास होऊ न देता आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन युवानमार्फत करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम