अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- न्यायालयाचे वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल देवराम मारुती गावडे (रा. गावडेवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर)
याला ३ वर्ष सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंड,दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी.एन.राव यांनी सुनावली आहे.
याबाबत अणिक माहिती अशी की, पोलिस कर्मचारी शरद देवीदास गावडे, रत्नपारखी आणि शिंदे हे न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट बजावणीसाठी दि. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी ढवळपुरी (ता. पारनेर) येथे गेले होते.
वॉरंटमधील आरोपी मारुती सखाराम गावडे यांच्या मुलाने पोलिस कर्मचारी शरद गावडे यांना सांगितले की, वॉरंटमधील आरोपी हे माझे वडील असून ते सध्या पुणे येथे दवाखान्यात उपचार घेत आहेत. तोपर्यंत पोहेकॉ.शिंदे हे तेथे पोहचले. त्यावेळी शेजारील घरातून एक व्यक्ती बाहेर आला व मोठमोठ्याने आरडाओरड करू लागला.
पोलिसांच्या दिशेने येऊन शासकीय कामात अडथळा आणला. वॉरंट हिसकावून घेत फाडले. किसन केशव भुसारी याने देखील पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. पारनेर पोलिस ठाण्यात आरोपी देवराम गावडे व किसन भुसारी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राहय धरून आरोपी देवराम गावडे याला सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तीन वर्ष सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंड.
दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. के. भोसले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम