…म्हणून शेतकऱ्यांनी केले ‘त्या’ कारखान्याचा ‘काटा बंद’ आंदोलन !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ३०० रुपये याप्रमाणे पहिली उचल कमीत कमी २५०० रुपये जाहीर करावी.

या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुरीच्या प्रसाद शुगर कारखान्याचा काटा बंद आंदोलन करण्यात आले.

कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने ‘आम्हाला चार-पाच दिवस वेळ द्या, योग्य तो निर्णय घेऊ’, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते प्रसाद शुगर कारखान्यावर गेले. व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी करून काटा बंद केला.

कारखाना व शेतकऱ्याचे नुकसान करण्यात आम्हाला स्वारस्य नसल्याचे व्यवस्थापनास सांगण्यात आले. परंतु एमडी व जबाबदार अधिकारी कारखान्यात हजर नसल्याने आंदोलनकर्त्यांनी जवळपास दोन तास काट्यावर बसून ठिय्या मांडला.

यानंतर दूरध्वनीवरून वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर चार ते पाच दिवस वेळ द्या, शेतकरी व संघटनेच्या मागणीप्रमाणे योग्य तो निर्णय घेऊ,

असे आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेऊन काटा पूर्ववत सुरू करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe