अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नेवासे तालुक्यातील सौंदाळा परिसरातील हाटेल जयराजश्री जवळ शनिवारी सकाळी ९.३० वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांकडून एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ८८९५ या शेवगाव डेपोच्या बसवर दगडफेक करण्यात आली.
यात बसचालक बसतो त्या बाजूची पुढची एक काच फुटली आहे. ही बस शेवगावकडून नेवासेकडे जात असताना ही घटना घडली. दगडफेक करणारे मात्र पसार झाले आहेत.
एसटीच्या संपातून शेवगाव डेपोच्या कर्मचाऱ्यांनी माघार घेतली असून शेवगावमधून बसेस सुरू झाल्या आहेत. नेवास येथे शनिवारी शेवगाव-धुळे ही गाडी सकाळी आली होती.
ही दगडफेक झालेली गाडी सुद्धा नेवासे-शेवगाव फेऱ्या मारणार होती. परंतु सदरच्या गाडीवर दगडफेक झाल्यामुळे या फेऱ्या रद्द झाल्या आहेत.
बसचालक नामदेव खंडागळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
पोलिस खात्याकडून चालू झालेल्या बसेसला संरक्षण देण्यात येणार होते. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये खंत व्यक्त करण्यात येत होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम