अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले असून किरकोळ कामे वेगाने उरकली जात आहेत. कारण आता उद्घाटनाची वेळ जवळ आली आहे.
उद्घाटनासाठी महसूल तसेच वैयक्तिक बाबीत अनन्यसाधारण महत्वाचा असलेला ‘७/१२’चा मुहूर्त गाठण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या साक्षीने या कार्यालयाचे लोकार्पण करण्याचे प्रयत्न असून उद्घाटनाचा दिवस निश्चित करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान नव्या इमारतीत साहित्य हालविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
इंग्रज काळापासून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या अस्तित्वात असलेल्या परिसरातून सुरु आहे. मात्र ही इमारत रस्त्याच्या दुतर्फा वसलेली आहे. एकेकाळी शहराच्या पूर्वेस असलेले जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय आता मध्यवस्तीत आले. तसेच जुनी झालेली ही इमारत सध्या शहराच्या वर्दळीच्या भागात आली आहे.
प्रशासकीय व मंत्र्यांच्या बैठकांसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या तसेच व्यक्तिगत कामे घेऊन प्रशासनाकडे येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते. बैठकांसाठी येणारे पदाधिकारी, अधिकारी यांची वाहने, विविध कामासाठी येणारे नागरिक व दाद मागणारे आंदोलक यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक कोंडीचे स्वरूप येत गेले.
ही परिस्थिती विचारात घेऊन कॉंग्रेस आघाडी सरकारच्या तत्कालीन राजवटीत राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेत, प्रशस्त जागेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तूचा आराखडा करण्याचे निर्देश दिले. सन २००९ मध्ये यास प्रशासकीय मान्यता मिळाली.
शासकीय विश्रामगृहानजीक असलेल्या भूसंपादन विभागाच्या शासकीय जागेत नूतन सहा मजली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीचा आराखडा तयार करण्यात आला. ना.थोरात यांच्या हस्तेच नूतन इमारतीची पायाभरणी सन २०१४ मध्ये करण्यात आली.व आता उदघाटन देखील त्यांच्याच कार्यकाळात होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम