Guidelines for Mahaparinirvana Day : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना

Ahmednagarlive24 office
Published:

Guidelines for Mahaparinirvana Day :- मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे.

मुंबईमध्ये / महाराष्ट्रामध्येही ओमिक्रॉन प्रजातीची काही प्रकरणे आढळून आलेली असल्याने या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये / रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य झालेले आहे.

वरील पार्श्वभूमीवर या संक्रमण रोगाचा प्रभाव पाहता, यावर्षी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक ६ डिसेंबर, २०२१ रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :

यावर्षी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक ०६ डिसेंबर, २०२१ रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे.

कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रका अन्वये तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी दुःखाचा, गांभीर्याने पालन करावयाचा असून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे.

तसेच शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी जे व्यक्ती परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील.

तसेच औष्णिक पटेक्षण (Thermal Screening) च्या तपासणीअंती ज्यांचे शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच सदर कार्यक्रमास उपस्थित रहाण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचें पालन करावे, जेणेकरून, कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.

दिनांक ०६ डिसेंबर, २०२१ रोजीच्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी/ शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ/पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात देवू नयेत, तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे, तालुके यामध्येही आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक, जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक ते सनियंत्रण व उपाययोजना कराव्यात व त्यासंबंधीचे आदेश काढावेत.

कोविड- १९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे

तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन व स्थानिक प्रशासन स्तरावरुन आणखी काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.अशा मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक राज्य शासनाच्या गृह विभागाने प्रसिध्द केले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हा दंडाधिकारी अहमदनगर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe