अरे बापरे! गोड बोलून जावयाने सासऱ्याला घरी नेले अन?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  एका तरुणाने आपल्याच सासऱ्याची निर्घृण हत्या त्यांचा मृतदेह ओढ्यातील दगडाखाली पुरून ठेवल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळे याठिकाणी घडली आहे.

सासऱ्याची हत्या केल्यानंतर या घटनेची वाच्यता करू नका अशी धमकी कुटुंबीयांना दिली होती. मात्र गावातील अन्य लोकांमुळे ही घटना समोर आली आहे.

राजू निकम असे हत्या झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. तर लहू निकम असे त्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावात सिंधुदुर्ग येथील आदिवासी समाजातील काही नागरिक उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात किंवा माळरानावर झोपडी बांधून राहतात.

आरोपी लहू हा देखील शाहूवाडी येथील एका गावात झोपडी बांधून राहत होता. तसेच एका जनावराच्या गोठ्यात तो कामाला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी लहू याने आपल्या मालकाच्या घरी चोरी केली होती. या चोरीबाबतची माहिती सासरे राजू यांनीच मालकाला सांगितली असावी, असा संशय आरोपी लहूला होता.

त्यामुळे त्याने आपले सासू सासरे यांना गोड बोलून दोघांनाही निनाई परळे येथील आपल्या झोपडीत घेऊन आला होता. यानंतर घटनेच्या दिवशी रात्री सासरा-जावई यांनी एकत्र बसून मद्यपान केलं. पण दारू प्यायल्यानंतर जावई लहू याने आपल्या सासऱ्यासोबतचा वाद उकरून काढला आणि त्यांना बेदम मारहाण केली.

ही मारहाण इतकी भयंकर होती, की यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला.यानंतर जावयाने कडवी प्रकल्पाशेजारील एका ओढ्यातील दगडाखाली सासऱ्याचा मृतदेह पुरला.

तसेच पोलिसांना घटनेबाबत काहीही सांगितलं तर याद राखा, अशी धमकी आपल्या घरच्यांना दिली. त्यामुळे घाबरलेल्या घरच्यांनी याबाबत कोणालाही काहीही सांगितलं नाही.

पण निनाई परळे गावातील काही जणांनी फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. अन हा प्रकार समोर आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe