चंद्रकांत पाटील यांनाच मुख्यमंत्रिपदाची घाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांनाच घाई झाली आहे.

ज्या वेळी प्रसंग येईल त्या वेळी आपण तिथं कधी बसू असं त्यांना झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शनिवारी टोमणा लगावला.

पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे आणि त्यासाठी आम्ही दिवसाही स्वप्न पाहतो, असे वक्तव्य केले होते. याबाबत पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, पुन्हा मुख्यमंत्री होण्याची देवेंद्र फडणवीस यांना काही घाई नाही.

चंद्रकांत पाटलांना घाई आहे. ज्या वेळी प्रसंग येईल आणि आपण तिथ कधी बसू असं कदाचित त्यांना झालंय. त्यामुळे फडणसवीसांना माहीत आहे. त्यांच्या पक्षात त्यांचे कोण हितचिंतक आहेत आणि त्यांना हे सुध्दा माहीत आहे की, चंद्रकांत पाटील त्या यादीत नाहीत, असेही पाटील म्हणाले.

पाण्याचा प्रश्न भविष्यात बिकट: पाणी प्रश्न सर्वांसाठी महत्वपूर्ण असून शहरातील वाढती लोकसंख्या पाहता पाण्याचे व्यवस्थित नियोजन झाले पाहिजे, अन्यथा भविष्यात पाणी प्रश्न बिकट होईल असे सांगत जयंत पाटील म्हणाले, पाण्याचे नियोजन करताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागते.

पावसाने कधी फटका दिला तर संपूर्ण नियोजन ढासळते. यंदा प्रचंड पाऊस होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याचा वापर नीटप्रकारे करणे सर्वांसाठी आव्हान आहे. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यावर यापुढील काळात भर द्यावा लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe