खोटा गुन्हा दाखल केल्याच्या नैराश्यातून तरुणाने स्वतःला संपविले

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक फाटा येथील 22 वर्षीय तरुणाने मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. सुदर्शन चंद्रकांत राजगुरू (22 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील सुगाव फाटा येथील या तरुणांने राहत्या घरात छताच्या अ‍ॅगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्ये पूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती.

त्यामध्ये त्याने लिहीले आहे, तो नाशिक येथे कंपनीत नोकरीस असताना त्याच्या वर एक खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये त्यास दोन महिने न्यायालयीन कोठडीत राहावे लागले होते.

यावेळी त्याचे वडिलांकडे फिर्यादीने गुन्हा मागे घेण्यासाठी दोन लाख रूपयांची मागणी केली होती. गुन्हा दाखल होऊन जेलमध्ये राहावे लागल्याने तो काम करत असलेल्या व त्याचा उदरनिर्वाह होत असलेल्या कंपनीनेही त्याला नोकरीवरून काढून टाकले.

आपण खोटा गुन्हा दाखल करणार्‍याच्या त्रासाने आत्महत्या करत असून त्यांना जबाबदार धरून कडक शिक्षा व्हावी, असे या चिठ्ठीत लिहिलेले असल्याचे समजते. याबाबत अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.