महावितरणाने कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबवावी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- शेवगाव तालुक्यात महावितरण कंपनीने कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन येईल, असा इशारा मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे.

महावितरण कंपनीने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता शेती कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे.

याबाबत शेवगाव येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात आज मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण कंपनीचे उपअंभियता यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शेतीमालाची विक्री करण्यासाठी चांगले बाजारभाव मिळाले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली.

शेवगाव परिसरात जवळपास ६० टक्के रब्बी पेरणी झाली असून पिके जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना महावितरण कंपनीने रोहित्र बंद करण्याचे काम सुरू केले आहे.

महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीज वसुली त्वरित थांबवली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe