अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- येथील सुमन काळे हत्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा खटला सहा महिन्यात निकाली काढण्याचा आदेश जानेवारी 2021 मध्ये दिला होता. यावर कोणतीच कारवाई झाली नाही.
उलट ज्या ज्या वेळी या केससंबंधी न्यायालयाचा आदेश होईल, त्या वेळी काळे हिच्या कुटुंबीयांना त्रास दिला जातो. या खटल्यात आरोपी असलेला गुन्हे शाखेतील एक पोलीस कर्मचारी त्यांना धमक्या देत आहे.
यासंबंधी आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे. आता आम्ही भाजपतर्फे या खटल्यात लक्ष घालणार असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले. चित्रा वाघ शुक्रवारी अहमदनगला पीडित सुमन काळे यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी आल्या होत्या.
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्र परिषदेत त्यांनी काळे हत्याप्रकरणी गंभीर आरोप केले. वाघ पुढे बोलताना म्हणाल्या, सुमन काळे भटक्या समाजातील महिलांसाठी काम करताना पोलिसांनाही मदत करीत होत्या. 2007 मध्ये पोलिसांनी तिला खोट्या गुन्ह्यात अडकविले.
त्यामध्ये पोलिसांच्या अमानुष मारहाणीत तिचा मृत्यू झाला. हे प्रकरण दडपडण्याचा प्रयत्न झाला. 2007 मध्ये आलेल्या चौकशी अहवाल आल्यानंतर सात पोलीस आणि एका खासगी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना अभय देण्यात आले.
हा खटला अद्याप प्रलंबित आहे. खंडपीठाने सहा महिन्यांमध्ये सर्व सुनावण्या पूर्ण करा व पिडीत कुटुंबाला पाच लाखाची मदत द्या, असे आदेश दिले असताना सुद्धा अद्याप पर्यंत यावर कोणतीच कारवाई झाली नाही. वास्तविक पाहता खंडपीठाने सहा महिन्यांमध्ये सर्व खटला पूर्ण करा असे निर्देश दिले होते.
मात्र याकरता विशेष वकील नेमला नाही, म्हणून आम्ही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांची भेट घेतली असून त्यांना या सर्व प्रकरणाबाबत आम्ही अवगत केलेले आहे. त्यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालू असे सांगितले असल्याचे वाघ यांनी यावेळी सांगितले. राज्यात सध्या गुंड आणि गुन्हेगार मोकाट सुटले आहेत.
महिलांवर अत्याचार होत आहेत. काही नेते शिवराळ भाषा वापरत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे सोडून महाविकास आघाडीचे सरकार भाजपच्या पदाधिकार्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करीत आहे.
जाहीरपणे शिवीगाळ करणारे आणि त्याचे समर्थन करणार्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आयपीसी मधील कलमे संपली काय? असा सवाल वाघ यांनी यावेळी केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम