अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिक दहशतीखाली आले आहेत.
पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे गुन्हेगारी रोखण्यास सपशेल अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्याची मागणी वाढू लागली आहे. राहुरी शहरातील दारूचे दुकान फोडून अज्ञात दोन भामट्यांनी सुमारे सहा लाख रुपयांची रोकड पळविली.
ही घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री शहरातील आडवी पेठ येथील भरपेठेतील सोनाक्षी ज्वेलर्स हे सराफाचे दुकान फोडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला.
या घटनेमुळे व्यापारी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एकीकडे चोरटे सक्रिय झाले आहे मात्र पोलीस प्रशासन निष्क्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या चोरट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
देवळाली प्रवरा येथे दोन दिवसांपूर्वी दुकाने व पोष्ट ऑफिस फोडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते.
मात्र, त्यांनी कोणतीही माहिती न घेता व आपल्या वाहनातून खाली न उतरता पाहणी केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. चोऱ्यांना आळा घालण्याचे निवेदन देण्यास गेलेल्या
व्यापाऱ्यांना राहूरी पोलीस ठाण्यात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने आता व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे गुन्हेगारी रोखण्यास सपशेल अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्याची मागणी वाढू लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम