Biroba Maharaj Yatra: आणखी दोन वर्षे मनुष्याला पिडा ! जगाच्या कानाकोपर्‍यात आपत्ती… वाचा काय आहे बिरोबा महाराज यात्रेतील भाकित…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कोपरगावमधील वीरभद्र उर्फ बिरोबा महाराज यात्रेतील भाकिताकडेही लक्ष लागलेले असते. नुकत्याच पार पडलेल्या या यात्रेत जगात माणसांवर आलेले संकट आणखी दोन वर्षे राहण्याचे भाकित करण्यात आले आहे.

त्याचा संबंध सध्याच्या करोना माहामारीशी जोडला जाऊ लागला आहे. भोजडे येथील देवाचे भक्त (भगत) रामदास मंचरे यांनी हे भाकित केले आहे.

त्यांनी म्हटले आहे, आगामी वर्षात ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडेल. जनावरांच्या चाऱ्यांची सोय होईल. पिवळ्या रंगाच्या वस्तूंना महागाई राहील, आषाढ महिन्यात पंधरा दिवस अगोदर पाऊस लांबणार आहे.

कमीत कमी दोन वर्षे मनुष्याला पिडा राहील. जगाच्या कानाकोपऱ्यात आपत्ती येईल, असे भाकित रामदास मंचरे यांनी वर्तवले असल्याची माहिती कांतीलाल मैदड यांनी दिली.

करोनाच्या खंडानंतर यावर्षी चंपाषष्ठीला पारंपरिक पद्धतीने यात्रा साजरी झाली. यावर्षी भगूर, हनुमंतगाव, धोत्रे, भोजडे नागमठाण, वैजापूर व कोपरगाव येथील भक्त काठ्या घेऊन बिरोबा दर्शनासाठी आले होते.

त्यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी पारंपारिक पद्धतीने देवाची ओवाळणी केली. धनगरी ओव्या म्हटल्या गेल्या. डफ वाजून नृत्य करण्यात आले. महाआरती आणि महाप्रसादही झाला.

कोपरगाव शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र उर्फ बिरोबा महाराजांची चंपाषष्ठी निमित्त ही यात्रा साजरी केली जाते. त्यामध्ये हे होईक म्हणजे भविष्य वर्तविण्याची प्रथा आहे. यंदाची यात्रा ही शतकोत्तर उत्सवाची होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe