अहमदनगरकरांनो वाहतूकीचे नियम मोडताय! ही बातमी वाचा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  यापुढे वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. नगर वाहतूक पोलिसांनी शासन निर्णयानुसार सुधारित दंड आकारणी लागू केली असून विनालायसन वाहन चालविणार्‍यांना आता 500 रूपयांऐवजी थेट 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

नव्या दंड आकारणीनुसार आता नियमभंगासाठी किमान दंडाची रक्कम 200 ऐवजी थेट 500 रूपयांवर पोहचली आहे. अहमदनगर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने शासनाच्या मोटार वाहन (सुधारित) अधिनियम 2019 नुसार दंड आकारणीस शनिवारी भल्यापहाटेपासून सुरूवात केली आहे.

ई-चलान पद्धतीने ही दंड आकारणी होणार आहे. लायसनशिवाय वाहन चालविणे आता अतिमहागात पडणार आहे. यासाठी आधी 500 रूपये दंड आकारला जात होता.

आता थेट 5 हजार रूपये दंड होणार आहे. या प्रकारणात न्यायालयात खटला दाखल करण्याचीही तरतूद आहे. लायसनशिवाय वाहन चालविताना दुसर्‍यांदा किंवा पुन्हा, पुन्हा सापडल्यास दंडासोबत 3 महिन्यांसाठी लायसन अवैध ठरविले जाणार आहे.

नव्या नियमानुसार दंडाची सर्वाधिक वाढ लायसनशिवाय वाहन चालवून नियम मोडणार्‍यांसाठी झाली आहे.अशी असेल दंड आकारणी लायसनशिवाय वाहन चालविणे- 5 हजार. बोर्डशिवाय वाहन चालविले- 500 आणि पुन्हा नियम मोडल्यास 1500.

विना हेल्मेट- 500 रूपये आणि दुसर्‍यांदा हा नियम मोडल्यास 3 महिन्यासाठी लायसन अवैध. वाहन चालवताना मोबाईलचा वापर- 500 रूपये, पुन्हा नियम मोडणार्‍यांना 1500. सिट बेल्ट न वापरणार्‍यांना- 500 रुपये आणि नियमाचे पुन्हा उल्लंघन केल्यास 1500 रूपये.

ट्रिपल सिटसाठी 1 हजार रुपये दंड आणि पुन्हा ट्रिपल सिट सापडल्यास 3 महिने लायसन अवैध ठरविले जाणार आहे. राँगसाईड वाहन चालविणे- थेट न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे.

कर्णकर्कश हॉर्न- 1 हजार रूपये आणि पुन्हा हॉर्न वाजविल्यास 2 हजार रूपये. पोलीसांच्या इशार्‍याचे पालन न करणे- 500 रूपये आणि पुन्हा तिच चूक केली तर 1500 रूपये.

काचांना ब्लॅक फिल्म लावल्यास- 500 रूपये आणि पहिल्या दंडानंतरही काळी फिल्म कायम ठेवल्यास पुन्हा 1500 रूपये. मादक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविणार्‍यांना थेट न्यायालयात खटला चालविला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe