चोरट्यांची कमाल: चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले अन …!

 

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- अलीकडच्या काळात अनेक बाबतीत वेगवान बदल होत आहेत. मात्र या बदलत्या काळात चोरट्यांनी देखील त्यांच्या चोरीच्या बाबतीत कमालीचे बदल केले आहेत.

आतापर्यंत नागरी वस्ती, बँक, एटीएम, सोन्याची दुकाने आदी वस्तू चोरीला जात होत्या. मात्र कोरोनामुळे समाजातील मानसिक बदल झाला अन सर्व अनपेक्षित घटना घडत आहेत.

यात चोरीच्या घटना देखिल मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता चोरटे हाती येईल ती वस्तू लंपास करत आहेत. अशी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

या घटनेत चोरट्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडून तेथील कॉम्प्युटरचे विविध प्रकारचे साहित्य लंपास केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ग्रामपंचायतीचे काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला.

कार्यालयातील आतील कॉम्प्युटर रूमचे कुलूप तोडून कॉम्प्युटरचे विविध साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. चोरीच्या घटनेची माहिती ग्रामपंचायतीचे शिपाई ओहोळ हे सकाळी कार्यालय सफाईकरिता उघडल्या नंतर लक्षात आली.

त्यांनी आतील कार्यालयाची पाहणी केली असता कार्यालयातील कॉम्प्युटर सीपीओ सह अन्य वस्तू चोरीस गेल्याचे निदर्शनास आले .

या घटनेची तक्रार त्यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकाऱ्यांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.