ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे- पालकमंत्री हसन मुश्रीफ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तिसऱ्या लाटेचा,ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे.

असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना ओमायक्रॉनबाबत उपाययोजना व लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला अधिक गती देण्याची गरज असून त्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या घरोघरी जावून लसीकरण मोहिम पूर्ण करावी.

कोरोनाच्या तपासणीमध्ये जिल्हा राज्यात सर्वात पुढे असून रोज पाच हजार पेक्षा चाचण्या जिल्हयात होत असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले.

संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हयात औषध साठा, बेडची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे अशा सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

जिल्हयात आज पर्यंत ओमायक्रॉन व्हेरीयंटचा एकही रुगण आढळून आलेला नाही. जिल्हयात आत पर्यंत 308 नागरिक हे परदेशातून आले असून सर्वांची तपासणी करण्यात आली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्हयात 97.90 टक्के एवढे असून मृत्यूदर 1.99 टक्के इतका आहे. सध्या जिल्हयात 384 सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्हयात आता पर्यंत 9 लाख नागरिकांनी कोविड लशीचा पहिला डोस घेतला असून त्यापैकी 5 लाख नागरिकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशा लोकांचा प्रशासनाने शोध घेवून त्यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.

तसेच जिल्हयात आता पर्यंत ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेवून प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणाची विशेष मोहिम राबवून नागरिकांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. अशा सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

कोरोना मुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना आर्थिक मदत म्हणून 50 हजार रुपये दिले जातात आता पर्यंत जिल्हयात 162 कोरोना मृतांच्या वारसांना मदत दिली गेली आहे. उर्वरित मृतांच्या वारसांना मदत लवकर कशी मिळेल यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News