पैशासाठी रुग्णाची हेळसांड… ‘त्या’ डॉक्टरवर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- माणुसकीला काळिमा फासणारी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. एका डॉक्टरने अपघातग्रस्त रूग्णांला पुढील उपचारासाठी पाठविण्यापूर्वी पैशाची मागणी करून रूग्णांची हेळसांड केल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी फॅक्टरी येथे घडला आहे.(Ahmednagar Crime)

याप्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार फसियोद्दीयन शेख यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

दरम्यान, तहसीलदार शेख यांनी तात्काळ वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी संयुक्त तपासणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गुहानजीक भीषण अपघात झाला. त्यामध्ये तीन ठार तर सातजण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात उपचारांचे झालेले बिल भरा, त्यानंतरच रूग्णाला सोडतो, असा उर्मटपणा डॉक्टरांनी दाखविल्याबद्दल एका स्थानिक नगरसेवकानी स्वखर्चातून बिल भरून तेथून रूग्णांची सोडवणूक करून पुढील उपचारासाठी नगरला हलविले.

मात्र, डॉक्टरांनी पैशासाठी रुग्णांना ताटकळत ठेवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉक्टरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe