राहाता मध्ये निराधारांना दर महिन्याला मिळते 1 कोटी 21 लाखांची मदत

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्य शासनाच्या वतीने वंचित घटकांसाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असते. या विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून राहाता तालुक्या तील  12132  लाभार्थ्यांना दर महिन्याला 1 कोटी 21 लाख 72 हजार रूपयांची मदत दिली जात असल्याची माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.(destitute get money per month)

राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन आदी योजना समाजाती वंचित घटकांसाठी राबविण्यात येत असते.

या योजनांमध्ये लाभार्थ्यांना कमीत कमी 600 ते 1000 रूपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येत असते. राहाता तालुक्यात या योजनांसाठी आतापर्यंत 12 हजार 132 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 21 लाख 72 हजार 800 रूपयांचे अनुदान वितरित करण्यात येत असते.

संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला,

निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,  35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी,

सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000 पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेत 4098 लाभार्थ्यांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 42 लाख 12 हजार 400 रूपयांची मदत दर महिन्याला पाठविली जाते.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना निवृत्ती वेतन देण्यात येत असते. या योजनेत 5220 लाभार्थ्यांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 73 लाख 87 हजार 200 रूपयांची मदत दर महिन्याला पाठविली जाते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत दारिद्रय रेषेखालील 65 वर्षावरील सर्व व्यक्ती या योजनेत पात्र ठरतात. या योजनेत 2710 लाभार्थ्यांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 5 लाख 42 हजार  रूपयांची मदत दर महिन्याला पाठविली जाते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात.

पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून प्रतीमहा रु.200 व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रतीमहा रु.400 असे एकूण प्रतीमहा 600 निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे. या योजनेत 104 लाभार्थ्यांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3 हजार 200 रूपयांची मदत दर महिन्याला पाठविली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe