अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- पिंपळगाव वाघा (ता. नगर) सरपंच मंडाबाई बन्सी येणारे उर्फ मंडाबाई संजय शिंदे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समिती अहमदनगर अवैध ठरविले आहे.
मंडाबाई शिंदे यांनी ता. 1 फेब्रुवारी 2021 रोजी नगर उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांच्या कार्यालयाकडून कुणबी जात प्रमाण काढले होते. पिंपळगाव वाघा ग्रामपंचायतीची जानेवारी 2021 मध्ये निवडणूक होऊन, त्यामध्ये मंडाबाई शिंदे या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.
सरपंचपदाच्या निवडीसाठी त्यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र काढले होते. उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी जात प्रमाणपत्र देताना कुणबी जातीचे पुरावे न पाहता, सदरचे जात प्रमाणपत्र दिल्याचे जात पडताळणी समितीच्या निदर्शनास आले.
तक्रार यमुना वसंत कर्डिले यांचे विधीज्ञ ऍड. योगेश गेरंगे यांनी निदर्शनास आणून दिले. मंडाबाई शिंदे यांनी जात प्रमाणपत्र ता. 1 फेब्रुवारी 2021 रोजी काढले. परंतु, जात प्रमाणपत्र काढता आवश्यक असणारे महसुली पुरावे नक्कल मिळण्यासाठी अर्ज ता. 9 फेबुवारी 2021रोजी दिला.
ता. 10 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांना नक्कला मिळल्या. म्हणजेच ता. 1 फेब्रुवारी रोजी कुणबी जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करतेवेळी सदरहू महसुली पुरावे जे की, मंडाबाई शिंदे यांची वंशावळ सिद्ध होण्याकामी आवश्यक होते व जात प्रमाणपत्राकरिता आवश्यक शपथपत्र संचिकेत नंतर जोडल्याचे दिसून येत असल्याबाबत जात पडताळणी समितीने निकालात म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती, जातीचे प्रमाणपत्र देणे व त्याचे पडताळणीचे विनिनियम 2012 मधील कलम 4 नुसार उपविभागीय अधिकारी यांनी मंडाबाई शिंदे यांना जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करताना विहित करण्यात आलेल्या नियमांचे पालन केलेले नसल्याचे तक्रारदारांच्या वकिलांनी सिद्ध केले आहे, असे निकालामध्ये जात पडताळणी समितीने म्हटले आहे.
उपविभागीय अधिकारी नगर भाग यांनी जात प्रमाणपत्र निर्गमित करताना आवश्यक ते पुरावे विचारात घेतले नाहीत. कागदपत्रे अपूर्ण किंबहुना जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक ती कागदपत्रे समोर नसताना जात प्रमाणपत्र दिले. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे समितीने म्हटले आहे.
चौकट मंडाबाई शिंदे यांनी कोणतेही पुरावे न देता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मिळविलेले प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. हे प्रमाणपत्र लबाडीने मिळवून वर्षभर सरपंचपदाचा लाभ घेतला. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण लढा उभारणार आहोत. – यमुना वसंत कर्डिले
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम