महावितरणने शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी अन्यथा …! भाजपाच्यावतीने ‘हा’ गंभीर इशारा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक येत्या ८ दिवसांच्या आत थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य

मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांना निवेदनाद्वारे दीले.

यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, गेल्या कित्येक दिवसांपासून महावितरण विभागाने कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून अडवणूक चालवली आहे.

२ तासांचे भारनियमन वाढवून फक्त ६ तास वीज देण्याचा प्रताप महावितरण कडून चालू आहे. ६ तासही ती वीज शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने मिळत नाही.

कर्मचारी मनाला वाटेल तसे काम करत असून वाटेल तेव्हा दुरुस्ती साठी फिडर बंद करून ठेवतात. अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक नाही.

लागवडीचे दिवस असताना महावितरण कडून शेतकऱ्यांची चाललेली अडवणूक ही अत्यंत निंदनीय बाब आहे. भाजपा नगर तालुक्याच्या वतीने याबाबत अनेक वेळा निवेदन दिलेले आहे परंतु महावितरणने गांभीर्याने घेतलेले नाही.

त्यामुळेच येत्या ८ दिवसात महावितरणने तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून होत असलेली अडवणूक थांबवावी. अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असे कोकाटे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe