अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून भारतात करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत १५-१८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. मात्र, यातच तज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोना लसीचा हा बूस्टर डोस देखील लोकांना ओमायक्रॉनची लागण होण्यापासून रोखू शकणार नाही, या माहितीमुळे लसीकरण घेणारे देखील चांगलेच धास्तावले आहे. यामुळे लसीकरण करून घ्यावे कि नाही असा सवाल आता नागरिकांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे.
आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलायल बोलताना म्हणाले, “करोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही.
नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमायक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही.
कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमायक्रॉनची लागण झाली,” असं त्यांनी सांगितलं. कोणत्याही वैद्यकीय समितीने बूस्टर डोसची शिफारस केलेली नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. मुलीयल म्हणाले की, “आपण जास्त काळ घरात कोंडून राहू शकत नाही. असंही ओमायक्रॉनचा प्रभाव डेल्टा प्रकारापेक्षा खूपच सौम्य आहे. शिवाय सुरुवातीला लस देशात येईपर्यंत सुमारे ८५% भारतीयांना संसर्ग झाला होता.
अशा परिस्थितीत, लसीचा पहिला डोस हा पहिल्या बूस्टर डोससारखा होता कारण बहुतेक भारतीयांमध्ये नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती होती,” असं त्यांनी सांगितलं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम