अशी वेळ कोणावरही येऊ नये ! ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने ट्रॅक्टर चालकाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू …

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   श्रीरामपूर तालुक्यातुन एक वाईट बातमी समोर आली आहे, येथे ट्रॅक्टर चालकाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने हळंहळ व्यक्त होते आहे. वाढदिवसाच्या दिवशीच चालकावर काळाने झडप घातली असून, यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कारखाना परिसरामध्ये विश्रांतीसाठी झोपी गेलेल्या ट्रॅक्टर चालक नानासाहेब दगडू मेचे (वय 40) यांचा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नानासाहेब दगडू मेचे हे आपला ट्रॅक्टर खाली करण्यास वेळ आहे म्हणून विश्रांतीसाठी शेजारच्या ट्रॅकर जवळ जाऊन झोपी गेले.

ज्या ट्रॅक्टर खाली मेचे हे झोपले होते त्या ट्रॅक्टर चालकाला या गोष्टीची कल्पना नसल्याने त्याने आपला ट्रॅक्टर चालू करून मागे घेऊन पुढे घेतला.

असे केल्याने ट्रॅक्टर खाली झोपलेले मेचे यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखत ट्रॅक्टर चालकाने तात्काळ घटनेची माहिती आजूबाजूच्या वाहन चालकांना व तेथील ग्रामस्थांना दिली.

यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मयत नानासाहेब दगडू मेचे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल याठिकाणी आणला.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नानासाहेब मेचे यांच्या नातेवाईकानीं तक्रार दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News