अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील सलाबतपूर-गोगलगाव रस्त्यावरील पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्वरीत दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी सलाबतपूरचे सरपंच अझर शेख यांनी केली आहे.
पावसाळ्यात लहान मुले याच पुलावरून शाळेत जातात. महिलांनाही कामानिमित्त जावे यावे लागते. रस्ता अनेक वर्षांपासून वाहतुकीस धोकादायक बनला असून याकडे प्रशासनाचे निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.
दोन वर्षांपासून सलाबतपूर परिसरात पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. त्यामुळे या नदीला चांगले पाणी टिकून राहिले. मात्र नदीवरील पूल हा पन्नास वर्षांपूर्वीचा जुना असून नादुरुस्त झाला आहे. या पुलाची कधी डागडुजीही झालेली नाही. या पुलाच्या कामाला मोठा तडाही गेला आहे.
त्यामुळे या पुलाची अवस्था अतिशय बिकट बनली आहे. अतिवृष्टी व दळणवळणाच्या अतिरिक्त वापरामुळे पुलाचे तीनतेरा वाजले आहेत. गंगाथडीच्या पट्ट्यात ऊस उत्पादन जास्त असल्याने या पुलावरून मोठ्याप्रमाणात ऊस वाहतूक होते आहे.
प्रशासनाचा डोळा चुकविण्यासाठी वाळू व मुरूम विटभट्टीसाठी माती याच रस्त्यावरून वाहिली जाते.पूल शेवटची घटका मोजत असून याची दुरुस्ती लवकर व्हावी, अशी मागणी होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम