सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यामध्ये एकवीस संचालक मंडळाच्या जागांसाठी मतदान शुक्रवारी झाले होते.
शनिवारी सकाळ पासून मतमोजणी सुरू असून राजेंद्र नागवडे यांचे किसान क्रांती मंडळ आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया झाल्याने मतमोजणीसाठी वेळ लागत आहे
नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते आणि केशवराव मगर यांच्या पॅनल विरोधात विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पॅनल मध्ये लढत झाली.
यामध्ये आतापर्यंत 21 जागांपैकी 9 जागांचा निकाल जाहीर झाला असून, या सर्व 9 जागांवर राजेंद्र नागवडेच्या किसान क्रांती मंडळाने विजय मिळविला आहे.
हे सर्व विजयी उमेदवारांनी सहकार विकास मंडळाच्या उमेदवारांचा अडीच ते तीन हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे. राजेंद्र नागवडेही आघाडीवर असल्याचे चित्र असल्याने नागवडे समर्थक उत्साहात आहेत.
सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान झाले.
परिणामी, मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांची गर्दी पाहायला मिळत होती. त्यातच, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकेक मतदान घडवून आणण्यावर भर दिला आहे.
नागवडे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले आहे. 19 हजार 822 पैकी 16 हजार 978 (86 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान शांततेत पार पडले. 21 जागांसाठी 44 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आज श्रीगोंदे शहरातील शासकीय गोदामात मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी राजेंद्र नागवडे गटासमोर पाचपुते-मगर गटांनी एकत्र येत कडवे आव्हान उभे केल्याने, सर्वांनाच निकालाची उत्सुकता आहे.
त्यामुळे मतमोजणी केंद्राला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार, प्रतिभा पाचपुते, भगवानराव पाचपुते या दिग्गज मंडळींचे भवितव्य काही तासात कळणार आहे.