शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे शेतीच्या पाट पाण्याच्या वादातून ज्ञानेश्वर नागरगोजे रा. भातकुडगाव या शेतकऱ्याचा खून झाला होता.
या घटनेतील आरोपी चित्तरंजन रामचंद्र घुमरे (वय 31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे, वय 35 दोघे रा. भातकुडगाव, या दोघा सख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा यांनी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भातकुडगाव येथे ज्ञानेश्वर नागरगोजे हे आपल्या आई-वडिलांसोबत राहून शेती करत होते. ज्ञानेश्वर यांनी आपल्या मामाचा मुलगा वैभव हरिभाऊ सानप (रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड) याला भातकुडगाव येथे शेती कामाच्या मदतीसाठी बोलवले होते.
रात्रीच्या साडे दहाच्या सुमारास ज्ञानेश्वरव वैभव हे पिकाला पाणी देण्याठी शेतात गेले होते. ज्ञानेश्वर यांनी शेजारील चित्तरंजन व प्रियरंजन घुमरे यांच्या शेता जवळील पाटपाण्याच्या चारीचे पत्राचे गेट उघडले आणि रात्री 11 च्या सुमारास सामनगाव चौफुलीवर मुळा चारीच्या पाटावर आले.
त्याठिकाणी घटनेतील आरोपी चित्तरंजन व प्रियरंजन हे दुचाकीवरून आले. व त्यांनी आमच्या शेताजवळील चारीचे पत्राचे गेट का काढले ? असे म्हणून शिवीगाळ करत, मारहाण करण्यास सुरूवात केली.
या मारहाणीत ज्ञानेश्वर सुमारे 10 फुट उंचीवरून खाली डोक्यावर पडला. त्यांच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घुमरे बंधू तेथून पळून गेले. वैभवने परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने ज्ञानेश्वरला उपचारासाठी शेवगाव येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते.
या संदर्भात वैभव हरिभाऊ सानप यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात आरोपी घुमरे बंधूंच्याविरूध्द फिर्याद दाखल केली होती. शेवगाव येथील सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात असून, आरोपी घुमरे बंधूंच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड, व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा ठोठविण्यात आली आहे.