अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- अलीकडच्या काळात अल्पवधीत रग्गड पैसे मिळवण्यासाठी अनेकजण वाळूची तस्करी करतात. त्यामुळे अशा लोकांची दादागिरी देखील वाढली आहे.
नुकतीच श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावामध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस वाहनाला वाळूतस्करी करणाऱ्या टेम्पोचालकाने धडक दिली.
या घटनेत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गाडीत बसलेले कर्मचारी बालंबाल बचावले.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळवे हे कमालपूर गावात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक पिवळ्या रंगाचा विना नंबरचा टेम्पो कमालपूर रस्त्यावरून जाताना दिसला.
त्यावेळी साळवे यांनी टेम्पोवाल्या वाळू तस्कराला थांबण्यास सांगितले; परंतु तो थांबला नाही, म्हणून साळवे यांनी धाडस दाखवत पोलीस वाहनातून या वाळू तस्कर टेम्पोचा एक किलोमीटरपर्यंत कमालपूर रोडने पाठलाग केला.
या पाठलागादरम्यान टेम्पो चालकाने पोलिसांच्या गाडीला धडक दिली व पुढे जाऊन टेम्पो सोडून तो पळून गेला. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात हा टेम्पो जप्त करण्यात आला असून फरार वाळूतस्कराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम