अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- दुचाकी चोरीची टोळी तयार करून अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील दुचाकीं चोरी करण्याचा उद्योग नगर तालुक्यातील बहिरवाडी जेऊर येथील तिघांनी सुरू केला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या उद्योगाची माहिती काढून दोघांना अटक केली आहे. सागर सुदाम जाधव, महेश ऊर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे (दोघे रा. बहिरवाडी जेऊर ता. नगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार गौतम पाटील पसार झाला आहे.
आरोपींकडून सात लाख 87 हजार रूपये किंमतीच्या 10 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वाढत्या दुचाकीं चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नियुक्त केले होते. या पथकाने दुचाकी चोरट्यांचा ठावठिकाणा शोधून काढला.
यावेळी सागर जाधव हा अन्य दोघांच्या मदतीने अहमदनगरसह पुणे जिल्ह्यातून दुचाकीं चोरी करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सुरूवातीला जाधव याला ताब्यात घेतले.
त्याने अन्य दोघांच्या साथीने दुचाकीं चोरी केल्या असल्याची कबूली दिली. त्यांचे नावे पोलिसांना सांगितले. त्यातील सुनील दारकुंडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
मात्र गौतम पाटील पसार झाला आहे. अटक केलेल्या आरोपींनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीसह पुणे जिल्ह्यातील राजंणगाव एमआयडीसी, शिरूर, शिक्रापूर येथून 10 दुचाकी चोरल्याची कबूली दिली आहे.
आरोपीविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात चार, राजंणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक, शिरूर पोलीस ठाण्यात एक तर शिक्रापूर पोलीस ठाण्यात तीन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम