सरकारचा ‘तो’ निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये वाईन विक्री करता येईल, असा निर्णय घेतला आहे. या समाजघातक निर्णयाचा सनातन संस्थेने निषेध केला आहे .

संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आदी शेकडो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि हजारो मावळ्यांच्या पराक्रमाने पुनीत झालेली भूमी मद्यप्यांची भूमी म्हणून म्हटली गेल्यास त्याचे पातक सरकारला लागेल.

सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासणारा हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे. पंजाबमधील युवापिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे,

त्यावर उडता पंजाबसारखा सिनेमाही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य दारूमुक्त, व्यसनमुक्त होण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत.

इथे मात्र वाईन सहजासहजी उपलब्ध करून आपण मद्यपिण्यास प्रोत्साहनच देत आहात. आधीच राज्यातील महिला आणि बालके दारुड्या पती आणि वडील यांच्या अत्याचारांनी पीडित आहेत.

या निर्णयामुळे हे अत्याचार वाढीस लागून त्याचे पाप सरकारच्याच माथी लागेल. अथर्ववेद, महाभारत, मनुस्मृती आदी अनेक धर्मग्रंथात मद्यपान हे महापाप सांगितले आहे.

त्याला प्रोत्साहन हेही महापापच ठरेल. त्यामुळे सरकारने हा समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्यावा, असे संस्थेने म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe