अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेताना स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत.
नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याकारणाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय आठवडाभर लांबणीवर टाकला आहे.
त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
कोरोना स्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यानुसार आता पुढील आठवड्यात आपत्ती व्यवस्थापन समितीची पुन्हा बैठक होणार असून, त्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असल्यास त्यानुसार शाळा सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले.
त्यानुसार आगामी काळात समितीची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापाठोपाठ आता नगर जिल्ह्यातील शाळांबाबतही लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम