अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) गुन्ह्यातील पसार असलेला सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
सोमनाथ रामदास खलाटे (वय 26 रा. खलाटवाडी ता. आष्टी जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकास लुटले होते.
ज्ञानेश्वर किसन गजरे (वय 27 रा. निघोज, ता. पारनेर) यांनी ताब्यातील ट्रक लघुशंकेसाठी रस्त्याच्याकडेला थांबविला. त्यावेळेस दुचाकीवर पाठीमागून आलेल्या तिघांनी ट्रकच्या केबिनमध्ये घुसले.
फिर्यादी व मदतनीस यांना कोयता व चाकूचा धाक दाखवून, मारहाण करून 46 हजार रुपये रोख व दोन मोबाईल फोन बळजबरीने हिसकावले होते.
गजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना स्वतंत्र पथक करून आरोपींचा शोध घेण्याबाबतचा आदेश दिला होता.
आरोपी सोमनाथ खलाटे हा गेवराई येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. आरोपी सोमनाथला तेथे जाऊन शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान आरोपी सोमनाथ खलाटे हा सराईत गुन्हेगार आहे.
त्याच्याविरुद्ध आरपीएफ पुणे रेल्वे पोलिस, लोणी, कोपरगांव तालुका, राहाता, संगमनेर तालुका, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, खुनासह दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी असे गुन्ह्यांचे स्वरुप आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम