कोव्‍हीड संकटात केलेल्‍या मदतीची श्‍वेतपत्रिका महाविकास आघाडी सरकारने काढावी

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली टिका राज्‍यातील कॉंग्रेस नेत्‍यांना एवढी बोचली असेल तर कोव्‍हीड संकटात केलेल्‍या मदतीची श्‍वेतपत्रिका महाविकास आघाडी सरकारने काढावी अशी मागणी भाजपाचे नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

आपले अपयश झाकण्‍यासाठी प्रधानमंत्र्यांच्‍या भाषणाबद्दल गैरसमज पसरविण्‍याचे काम करणारे आघाडी सरकार कोव्‍हीड संकटात कुठे होते असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

माध्‍यमांशी संवाद साधताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, प्रधानमंत्र्यांचे वक्‍तव्‍य कुठेही महाराष्‍ट्राच्‍या विरोधात नाही. कोव्‍हीड संकटात राज्‍य सरकार कोणत्‍याही समाज घटकाला मदत करु शकले नाही.

आपल्‍यावरची जबाबदारी टाळण्‍यासाठीच राज्‍यातील परप्रांतीय कामगारांना पाठवून देण्‍यासाठी कॉंग्रेस नेत्‍यांनी पुढाकार घेतला ही वस्‍तुस्थिती असल्‍याकडे लक्ष वेधून त्‍यांनी सांगितले की, जे कॉंग्रेस नेते आज प्रधानमंत्र्यांवर टिका करीत आहेत ते या संकटाच्‍या काळात फक्‍त मुंबईत बसून राहीले.

फेसबुकवर संवाद साधत होते, केंद्राच्‍या मदतीवरच अवलंबुन राहीले, मात्र केंद्राने दिलेल्‍या मदतीचाही यांना योग्‍य विनीयोग करता आला नसल्‍याचे दुर्दैव त्‍यांनी बोलून दाखवि‍तानाच रोज माध्‍यमांपुढे येवून पोपटपंची करणा-या संजय राऊतांनी किती कोव्‍हीड सेंटर उभारले असा प्रश्‍नही त्‍यांनी उपस्थित केला.

केंद्राने काय मदत केली असा प्रश्‍न विचारणा-या कॉंग्रेस नेत्‍यांचा समाचार घेताना आ.विखे पाटील म्हणाले की, महसुल मंत्री आज प्रधानमंत्र्यांवर टिका करतात परंतू त्‍यांच्‍या तालुक्‍यात एकही कोव्‍हीड सेंटर सुरु होवू शकले नाही, ४६ खासगी रुग्‍णालयांना परवानगी देवून नागरीकांना वा-यावर सोडले.

स्‍वत:चे अपयश झाकण्‍यासाठी केंद्रावर टिका करण्‍याची फॅशन झाल्‍याची टिका आ.विखे पाटील यांनी कॉंग्रेस नेत्‍यांवर केली. राज्‍यात आघाडी सरकारच्‍या भ्रष्‍टाचाराची लक्‍तरे आता बाहेर येवू लागली आहेत. भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधात बोलणा-यांचा आवाज दडपण्‍याचे काम सुरु झाले आहे.

पुणे येथे किरीट सोमय्या यांच्‍यावर झालेला हल्‍ला हा पुर्व नियोजीत आणि आघाडी सरकार पुरस्‍कृतच होता, असा थेट आरोप करतानाच भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधातील ही लढाई थांबनार नाही, किरीट सोमय्याही शांत बसणार नाहीत.

सरकारच्‍या विरोधात बोलणा-या १२ निलंबीत आमदारांबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयाने सरकारला फटकारले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि आ.नितेश राणे यांना होत असलेला त्रास पाहाता सत्‍तेचा केवळ गैरवापर सुरु आहे.

मात्र विरोधकांना नामोहरम करण्‍यात आघाडी सरकार यशस्‍वी होणार नाही असे स्‍पष्‍ट आ.विखे पाटील यांनी केले. राष्‍ट्रवादीच्‍या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्‍ये व्‍यक्‍त केलेल्‍या प्रतिक्रीयेवर प्रथमच भाष करताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, खा.सुप्रिया सुळे यांनी पुर्व इतिहास जागृत करायला हवा होता.

स्‍व.राजीव गांधी यांनी पक्षात घेवून तुम्‍हाला मुख्‍यमंत्री केले त्‍याच कॉग्रेसच्‍या पाठीत खंजीर खुपसून वेगळा पक्ष काढल्‍याचे काळाच्‍या ओघात तुम्‍ही विसरलात का? असा प्रश्‍न करतानाच खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी जो नेमका प्रश्‍न लोकसभेत उपस्थित केला त्‍या राज्‍यातील सहकारी साखर कारखान्‍यांच्‍या झालेल्‍या विक्रीबाबतही त्‍यांनी बोलले पाहीजे.

स्‍वरसंम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांना संपूर्ण जगातून श्रध्‍दांजली वाहत होतं. स्‍वत:पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर्व कार्यक्रम रद्द करुन, त्‍यांच्‍या अंत्‍यदर्शनासाठी मुंबईत आले. मात्र कॉंग्रेसचा एकही नेता तिथे उपस्थित नव्‍हता यावर भाष्‍य करताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, सत्‍तेसाठी लाचार झालेली कॉंग्रेस लतादिदींचा स्‍वरही विसरली असा टोला त्‍यांनी लगावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe