बिग मी इंडिया फ्रॉड प्रकरणातील आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची मोठी फसवणूक करण्यात आले असल्याचे यामध्ये उघड झाले होते.

दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गुंतवणूकदारांची तब्बल सात कोटी 68 लाख 64 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिग मी इंडिया कंपनीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ राऊत याच्यासह सात संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सतीश खोंडवे (रा. कागल जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान राऊत हा गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच पसार झालेला होता. तो सावेडीतील गुलमोहर रस्ता भागात वेशांतर करून आल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्यास अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe