अन आंदोलकांनी केले मिनी मंत्रालयाचे गेट ‘बंद’आंदोलकांनी केले जिल्हा परिषदेचे गेट बंद

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाल्याचा गंभीर प्रकार नुकताच घडला होता.

तरी याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशव्दारच बंद करून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

मागील काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाल्याचा गंभीर प्रकार घडला होता.

याप्रकरणी केंद्राच्या चुकीच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले होते. तसेच संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वीच आरपीआयच्या वतीने आत्मदहन आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला होता.

मात्र त्यावेळी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून त्रिस्तरीय समिती नेमली असून त्यांचा अहवाला आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यामुळे हे आंदोलन मागे घेतले होते. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने सोमवारी आरपीआयचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वात कुमार भिंगारे,

माऊली भागवत, जयेश माळी, गंगाधर गाकवाड, किशोर पंडित, सागर संसारे आदीसह देवळाली प्रवरा येथील या तरुण जिल्हा परिषदेत निवेदन देण्यासाठी आले होते.

मात्र त्यांच्याकडे संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर ठिया आंदोलन केले.