अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- एसटीच्या कर्मचार्यानेच एसटी बसवर दगडफेक केली. अहमदनगर शहरातील झुलेलाल चौकात ही घटना घडली.पारनेर आगारात कार्यरत असणारा कर्मचारी मनोज विठ्ठल वैरागर (रा. शांतीपुर, तारकपूर, अहमदनगर) याने ही दगडफेक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान दगडफेक झालेल्या एसटी बसवरील चालक दत्तात्रय गंगाधर गिरी (रा. गणेशनगर ता. संगमनेर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वैरागर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय गिरी हे त्यांच्याकडील संगमनेर-अहमदनगर ही बस (क्र. एमएच 11 बीएल 9386) घेवुन अहमदनगर शहरामध्ये आले होते. ते जिल्हा रूग्णालयाकडील जाणार्या रोडवरून बस घेवुन जात असताना मनोज वैरागर याने झुलेलाल चौकात बसवर दगडफेक केली.
या दगडफेकीत बसच्या डाव्या बाजुची काच फुटून नुकसान झाले आहे. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक धनराज जारवाल यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान बसचे चालक गिरी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुनील शिरसाठ करीत आहेत.