अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- शहरातील लालटाकी परिसरात झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वर्षानंतर पाथर्डी येथून अटक केली.
संतोष बबन भारस्कर (वय 41 रा. लालटाकी, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लालटाकी येथील माया वसंत शिरसाठ (वय 35) यांची पाथर्डी येथील बहिण भारती दीपक आव्हाड व माया शिरसाठ यांच्या शेजारी राहणारी सारीका संतोष भारस्कर यांचे नातेवाईकांचे पाथर्डी येथे भांडण झाले होते.
या कारणावरून 10 एप्रिल 2019 रोजी दुपारी सारीका भारस्कर व त्याचे नातेवाईक नितीन विक्रम दिनकर, विक्रम लहानू दिनकर, मुकेश विष्णू दिनकर व इतर 14 ते 15 जणांनी माया शिरसाठ व त्यांची सासू बेबी अर्जुन शिरसाठ, दीर सचिन शिरसाठ, विनोद शिरसाठ, संतोष शिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके, चाकू तलवारीने मारहाण करून बेबी शिरसाठ यांचा खून केला होता.
याप्रकरणी माया शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल होता. यातील आरोपी संतोष भारस्कर याला दोन वर्षानंतर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अटक केली.