शिवसेनेने मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून दिले; विखे पाटलांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  ‘मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून समाजाची फसवणूक करत आहेत. आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे.

समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्‍यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्‍या मंत्र्यांनी तात्‍काळ राजीनामे द्यावेत,’ अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून उद्याच मी मुंबईत त्‍यांची भेट घेणार आहे.

तसेच ‘महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजासह ओबीसी व धनगर समाजाची मोठी फसवणूक केली. या सरकारवर कोणत्‍याही समाजघटकांचा आता विश्‍वास राहिलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर १७ जून २०२१ रोजी झालेल्‍या बैठकीत सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता होऊ शकली नाही. याचा निषेध म्हणून खासदार संभाजीराजे यांना आझाद मैदानवार उपोषणाला बसण्याची वेळ आली.

मराठा समाजातील तरूणांच्या हितासाठी वारंवार केलेल्या मागण्यांवर सरकारने फक्त आश्वासने दिली. या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारमधील एकही मंत्री बोलायला तयार नाही.

शिवसेना मराठी माणसाचा कैवार घेऊन राजकारण करते, मात्र त्यांनीच मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून दिले. मराठी माणसाचा अवमान त्‍यांनी केला आहे,’ असा आरोपही विखे पाटील यांनी केला.