अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयाबाबत विविध मागण्या व अनागोंदी कारभाराविरोधात सुरु असलेलं सत्याग्रह आंदोलन अखेर आश्वासनानंतर मागे घेतले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी भेट देऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून सर्व मागण्या सोडविण्याची ग्वाही दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/01/Decision-to-start-school-after-15-days-Health-Minister-Tope.jpeg)
दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर व शहानवाज शेख यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात रुग्णालयाच्या कारभाराविरोधात बैठा सत्याग्रह सुरु केला होता.
राष्ट्रवादीचे नेते अड.प्रताप ढाकणे यांनी आंदोलन स्थळी भेट देत चर्चा केली. मंजूर असलेली पदे रिक्त असणे,तज्ञ डॉक्टरांची वानवा,औषधांचा नेहमीच तुटवडा तसेच लाखो रुपयांच्या साधन सामुग्री धूळखात पडून असून
मुख्य वैद्यकीय अधिक्षक हे पदच सन 2015 पासून रिक्त असल्याने आलेली प्रशासकीय मरगळ याबाबत सविस्तर माहिती देऊन आंदोलकांनी अॅड.ढाकणे यांचे लक्ष वेधले.
अॅड.ढाकणे यांनी आंदोलनकर्त्यासमोरच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी भ्रमणदूरध्वनीहून संपर्क करून माहिती देत चर्चा केली.
ना.टोपे यांनी महिनाभरात सर्व अडचणींची सोडवणूक करून सर्व मागण्या मान्य असल्याचे सांगितले. वरिष्ठ पातळीवर संपर्क करून लक्ष वेधुन दखल घेण्यास भाग पाडल्याबद्दल अॅड.ढाकणे यांचे हरेर व शेख यांनी आभार मानले.